व्हेरी स्पेशल : टू स्पेशल
टू बी ऑर नॉट टू बी ? एका उपसंपादकाला पडलेला हा प्रश्न. आपल्या
पत्रकारितेच्या पेशात तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारा उपसंपादक आणि लोकांना मॅनेज
करणं हाच पेशा असलेली एक स्त्री. एकेकाळचे हे प्रेमिक दहा वर्षांनंतर अचानक
एकमेकांसमोर येतात. कामाचा भाग म्हणून घ्यावी लागणारी विशिष्ट भूमिका आणि ती
घेताना संवेदनशील माणूस म्हणून होत असलेली दोघांचीही घालमेल हा ‘दोन स्पेशल’चा विषय.
काळ आहे साधारण पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा. वृत्तपत्र व्यवसायात
मुल्यांचा ऱ्हास होत असतानाही काही तत्त्वं निष्ठेनं जपणारा मिलिंद भागवत हा उपसंपादक
(जितेंद्र जोशी)
रात्रपाळीसाठी दै. हिंदुस्थानच्या कार्यालयात पोहोचला आहे. तेवढ्यात बातमी येते
शहरातली सांस्कृतिक भवनची इमारत कोसळून त्याखाली एका मुजराचं मूल दगावल्याची आणि
काही जण जखमी झाल्याची. ही बातमी पहिल्या पानावर फोटो आणि तपशीलासकट घेण्याएढी
महत्त्वाची आहे. पण पुढे घडतंय ते सगळंच अनपेक्षित.
बातमीतले काही तपशील वगळावेत यासाठी वृत्तपत्राच्या कार्यालयात स्वप्ना
(गिरीजा ओक-गोडबोले) येते. ज्या बिल्डरने ही इमारत बांधली आहे त्याच्या ऑफिसमध्ये
ती जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत आहे. इतर वेळी अशा प्रकारच्या कुठल्याही
दबावाला बळी पडणं मिलिंदच्या बाबतीत शक्यच नाही. पण इथं मात्र पेच निर्माण झालाय. समोर
स्वप्ना आहे. स्वप्नासोबतच्या प्रेमकहाणीचा भूतकाळ आहे आणि काहीही निर्णय घेतला
तरी कोणाच्या तरी भविष्यावर त्यामुळे परिणाम होणार आहे.
“असं काही होऊ शकेल
का की ज्यामुळे तुलाही काँप्रमाईज करावं लागणार नाही आणि मलाही मॅनेज करावं लागणार
नाही?”, हा
स्वप्नाचा भाबडा प्रश्न.
घड्याळाचा काटा पुढे सरकत राहतो आणि हा गुंता वाढत जातो. दहा
वर्षांपूर्वी एकाच वृत्तपत्रात काम करणारे हे दोघे. आता दोघांचीही लग्न झाली आहेत..वाटा
वेगळ्या झाल्या आहेत. हे का आणि कसं घडलं हे एकमेकांना सांगतानाच समेवर येताना
मात्र पुन्हा एकदा ‘टू बी ऑर नॉट टू बी ?’ हा प्रश्न आहेच.
बेताची आर्थिक परिस्थिती, आजारी वडील आणि कौटुंबिक समस्यांनी गांजलेला
हा उपसंपादक आपल्या पत्रकारितेच्या पेशात मात्र ताठ कण्याने वावरत आहे. बरोबरीचे
सहकारी ‘प्रगती’ करत असतानाही बारा-पंधरा
वर्षांनंतरही पहिल्याच पायरीवर, म्हणजेच उपसंपादकच राहिलेला आहे. सहकारी आणि
व्यवस्थापनाविषयी राग, परिस्थितीबद्दलचं शल्य, बातम्यांकडे तटस्थपणे पाहतानाही न
हरवलेली संवेदनशीलता आणि अत्यंत कडवेपणाने पत्रकारितेचा धर्म पाळल्याचा अभिमान हे
जितेंद्र जोशीनं विलक्षण ताकदीने उभं केलंय. आवाजातले चढउतार आणि पट्टीतले बदल विशेष
उल्लेखनीय. कधी जरब आणि कधी मार्दव अफलातून.
परिस्थितीमुळे निर्माण झालेली स्वप्नाची आगतिकता आणि अपरिहार्यता गिरीजानं
समर्थपणे उभी केली आहे. ती भूतकाळातले काही प्रसंग सांगत असताना करताना अंगावर
काटा उभा राहातो. आपलं मन मोकळं होत असलं तरी दसऱ्याची काळजी आपण वाढवत आहोत याचं
तिला भान आहे. मिलिंदचा ताठ बाणा तिला अजूनही आवडत असला तरी तिला हवी तशी बातमी
येण्यासाठीचे तिचे प्रयत्न शेवटपर्यंत सुरू आहेत.
ह. मो. मराठे यांच्या कथेवर आधारित या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन
क्षितीज पटवर्धनचं. त्याला नेपथ्याची उत्तम साथ प्रदीप मुळे यांनी दिली आहे.
युएनआय पीटीआयची टकटकणारी मशिन्स, भिंतीवर लोकमान्य टिळक आणि इतरांच्या तसबिरी..पाणी
पिण्याचा मोठा हंडा, लाकडी स्टूल आणि खूर्च्या, पिवळे दिवे आणि मधला टेकूचा खांब
(फोर्थ इस्टेट) हे सगळंच त्या काळच्या वृत्तपत्राच्या कचेरीत घेऊन जातं. छपाईच्या
यंत्रांच्या आवाज वातावरणातला तणाव आणि डेडलाइन याची जाणीव करुन देतो.
नाटकात पंचवीस वर्षांपूर्वीचे वृत्तपत्र दाखवले असले तरी कोणत्याही
माध्यमात काम करणाऱ्या लोकांपुढे आजही हा सनातन प्रश्न उभा राहतोच. म्हणूनच नाटक
फ्रेश वाटतं.
जितेंद्र-गिरीजाचा अभिनयासाठी आणि हमों आणि क्षितीज पटवर्धननं
केलेल्या विषयाच्या मांडणीसाठी नाटक बघायलाच हवं. खरं तर मला उशीरच झाला. तुम्ही पाहिलं
नसल्यास उशीर करू नका.
सागर गोखले