

सुधारित लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी उपोषण केले. या
आंदोलनाला देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळाला. अनेक
सेलिब्रिटींनीही अण्णांना जाहीर पाठिंबा दिला; शेकडो संघटना रस्त्यावर
उतरल्या. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून लाखो लोक अण्णांच्या मागे उभे
राहिले; तर उपोषणाला कोट्यवधी लोकांची सहानुभूती मिळाली. अण्णांना
आजवरच्या सामाजिक कार्यात जेवढी मिळाली नसेल तेवढी प्रसिद्धी आणि ग्लॅमर
९७ तासांच्या त्या उपोषणानं मिळवून दिलं...अण्णा इंडियन आयडॉल बनले..आता
इंडियन आयडॉल पार्ट- टू ची तयारी सुरू झालेय. आणि त्यात झळकणार आहेत बाबा
रामदेव...
अण्णांचाच मार्ग
व्यापक देशहिताचा आणि स्वातंत्र्ययुद्धाचा नारा देत अख्खा समाज कसा ढवळून
काढायचा याचा वस्तुपाठच जणू अण्णा हजारेंच्या आंदोलनानं घालून दिला.
अण्णांनी दाखवलेल्या दिशेने, अण्णांनीच दाखवलेल्या मार्गावरुन आणि थेट
अण्णांच्याच स्टाईलने रामदेव बाबा यांचे आंदोलन होणार आहे. भ्रष्टाचार
आणि काळ्या पैशाविरोधात ते उपोषणाला बसणार आहेत. भ्रष्टाचार मिटाव
सत्याग्रह असे या आंदोलनाचं नाव आहे. परदेशी बँकामधले 500 लाख कोटी
केंद्राने परत आणावेत आणि ते सार्वजनिक संपत्ती म्हणून जाहीर करावेत ही
त्यांची मागणी आहे, देशभरातली भ्रष्टाचाराची प्रकरणं निकालात काढण्यासाठी
जलदगती न्यायालयं स्थापन करावीत आणि भ्रष्ट व्यक्तिंना प्रसंगी
मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद असावी, असाही त्यांचा आग्रह आहे.
अण्णांच्या आंदोलनामागे व्यूहरचना होती. किरण बेदी, अरविंद केजरीवाल आणि
स्वामी अग्निवेश अशी मातब्बर मंडळी अण्णांबरोबर होती. अनेक संस्थांमधला
समन्वय, कित्येक महिन्यापासूनची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा याचाही
आंदोलन यशस्वी होण्यात मोठा वाटा होता. अण्णांचं आंदोलन तापवण्यासाठी
निश्चित अशी रणनिती आखण्यात आली होती. आंदोलन यशस्वी होण्यासाठी आर्थिक
पाठबळही भक्कम होतं. खुद्द रामदेव बाबा यांनीच आंदोलनासाठी दोनशे कोटी
दिल्याचीही चर्चा होती.
अखेर अण्णांची मागणी मान्य झाली. लोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीच्या
बैठकांना सुरवातही झाली आणि आता रामदेव बाबा भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा
केंद्रबिंदू बनू पाहात आहेत. त्यांनी एल्गार केलाय, भ्रष्टाचाराचे समूळ
उच्चाटन करण्याचा. आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे इतकेच नाही तर 25 तारखेला आपणही आंदोलनात सहभागी होऊ, असे खुद्द अण्णा हजारे यांनीच जाहीर केले आहे.
लोकपाल विधेयक आणि त्यातल्या तरतुदींना आपले आंदोलन पुरकच असल्याचा रामदेव बाबा यांचा दावा आहे. मात्र, सरकार लोकपाल विधेयकाचा मसुदा सौम्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका
अण्णा हजारे करत आहेत. पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
यांना लोकपालच्या कार्यकक्षेत आणण्याबाबत अण्णा हजारे ठाम आहेत, तर या
मुद्यावर रामदेव बाबांनी अण्णांपासून फारकत घेतलीय. या मुद्यावर काहीशी
सरकारधार्जिणी भूमिका घेणारे रामदेव बाबा ४ जूनपासून आंदोलन करण्यावर
मात्र ठाम आहेत..
अण्णांचे आंदोलन म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातली सर्वांत व्यापक चळवळ
असल्याचे चित्र माध्यमांमधून मांडण्यात येत होते. त्यात वृत्तवाहिन्या
आणि इंटरनेट अग्रेसर होतं. रामदेव बाबाही फेसबूकवर असून हजारो लोक
त्यांना पसंत करत असल्याचे दिसतंय. त्यांच्या उपोषणालाही लाखो लोकांनी ट्विटरवरुन
पाठिंबा दिलाय. रामदेव यांच्या पतंजली योगपीठाचे देशभरात लाखो
साधक आहेत. गेल्या काही दिवसात रामदेव बाबांनी अनेक शहरात योगशिबिराच्या
माध्यमातून आंदोलनासाठी जनजागृती तयार केलीय. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी
देशातल्या सहाशेहून अधिक जिल्ह्यात एक कोटी लोक लाक्षणिक उपोषण करतील,
अशी रामदेव बाबांची खात्री आहे. शिवाय देशभरातले त्यांचे भक्तही विविध ठिकाणी
धरणं आंदोलन करणार आहेत. सध्या तरी रामदेव बाबांना एकच खात्री आहे-
जाग उठे है लोग देशमे आँधी चलने वाली है;
भूख और भ्रष्टाचार में डुबी रात गुजरने वाली है ...
